जे. जे. रुग्णालयात ३३ कोटींचे अत्याधुनिक रोबोटिक 'HIFU' यंत्र; प्रोस्टेट उपचारांसाठी मोठी चिरफाड टळणार!
मुंबई : सर जे. जे. समूह रुग्णालयातील युरॉलॉजी विभागासाठी अत्याधुनिक रोबोटिक ‘हिफू’ यंत्र खरेदी करण्यास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या यंत्रासाठी ३३ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
या रोबोटिक यंत्राद्वारे रुग्णांवर मोठी चिरफाड टाळून प्रभावी उपचार करता येणार आहेत.
यंत्राची तांत्रिक वैशिष्ट्ये सर्वसमावेशक असावीत व किमान तीन उत्पादक किंवा पुरवठादारांकडून निविदा प्राप्त होतील, अशा पद्धतीने ती निश्चित करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. यंत्राची बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी होणार नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण आयुक्त आणि संबंधित अधिष्ठात्यांवर सोपविण्यात आली आहे.
एचआयएफयू (हाय इंटेन्सिटी फोकस अल्ट्रासाउंड) हे ध्वनिलहरींच्या मदतीने आजारग्रस्त भागावर उपचार करणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. या पद्धतीत शरीराची मोठी चिरफाड न करता, आजाराच्या ठिकाणी अचूकपणे ध्वनिलहरी सोडल्या जातात. त्यामुळे त्या भागातील आजारग्रस्त ऊतींवर उपचार करता येतात.
यंत्रातील रोबोटिक प्रणालीमुळे उपचाराचे ठिकाण अधिक अचूकपणे निश्चित करून ध्वनिलहरी सोडण्यास मदत होते. या यंत्राची किंमत सुमारे ३३ कोटी रुपये असून, जे. जे. रुग्णालयासाठी एक यंत्र खरेदी करण्यात येणार आहे.
रुग्णांना याचा काय फायदा?
युरॉलॉजी क्षेत्रात, विशेषतः प्रोस्टेटशी संबंधित काही आजारांमध्ये, एचआयएफयू तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. योग्य रुग्णांची निवड झाल्यास त्याचे काही महत्त्वाचे फायदे असे असू शकतातः
शरीरावर मोठी जखम करण्याची गरज कमी : पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत काही उपचारांमध्ये शरीरावर मोठी जखम करण्याची गरज कमी होऊ शकते.
रक्तस्राव कमी होण्याची शक्यता : ऊतींवर लक्ष्यित पद्धतीने उपचार होत असल्यामुळे काही रुग्णांमध्ये रक्तस्रावाचे प्रमाण कमी राहू शकते.
रुग्णालयात कमी काळ राहण्याची शक्यता : उपचाराच्या प्रकारानुसार रुग्णाला तुलनेने लवकर घरी जाता येऊ शकते.
उपचार अधिक अचूक करण्यास मदत: प्रतिमेच्या मार्गदर्शनासह रोबोटिक प्रणाली वापरल्यामुळे आजारग्रस्त भागावर अधिक अचूकपणे उपचार करण्यास मदत होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.