मुंबई : बनावट आणि अपात्र वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून (एमएमसी) ‘नो युवर डॉक्टर’ (केवायडी) प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. एमएमसीकडे नोंदणीकृत सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी प्रत्येक कामाच्या ठिकाणी अधिकृत केवायडी क्यूआर कोड प्लेट ३१ ऑक्टोबरपर्यंत लावणे बंधनकारक केले आहे.
या नियमाचे तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास १५ हजारांचा दंड भरावा लागणार आहे. केवायडी प्रणालीमुळे रुग्णांना क्यूआर कोड स्कॅन करून संबंधित डॉक्टरची एमएमसी नोंदणी वैध आहे की नाही, याची तत्काळ पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे बनावट किंवा अपात्र डॉक्टरांवर नियंत्रण आणता येईल. रुग्णांना सहज स्कॅन करता यावे, यासाठी ही प्लेट प्रतीक्षालयात ठळकपणे लावणे आवश्यक आहे. डिजिटल प्रतिमा, स्क्रीनशॉट किंवा कागदी प्रिंटआउट ग्राह्य धरले जाणार नाहीत.
३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदत
केवायडी प्रणालीचे पालन करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ आहे. तसेच तक्रार-आधारित पद्धतीने कारवाई केली जाईल, असे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास इशारा पत्र दिले जाईल. तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास ५ हजारांचा दंड व त्यानंतरही पालन न केल्यास १५ हजारांचा दंड, अंतिम सात दिवसांची मुदत आणि पुढे शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
लॉगिन डॉक्टर पर्यायातून पडताळणी
डॉक्टरांनी केवायडी या संकेतस्थळावर ‘लॉगिन डॉक्टर’ द्वारे एमएमसी नोंदणी क्रमांकाद्वारे लॉगिन करून, नोंदणीकृत मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे माहिती पडताळावी. त्यानंतर प्लेटची संख्या निश्चित करून शुल्क भरावे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवाणी यांच्या मान्यतेने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.