नुकत्याच झालेल्या SIR अंतर्गत महाराष्ट्रात प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीतून जवळपास २ कोटी ६ लाख मतदारांना वगळण्यात आल्याची माहिती आहे. यावरूनच राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही यावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, SIRपूर्वी महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ मतदारांची नावं नव्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र, २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांना या यादीतून वगळण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजेच जवळपास २१.१४ टक्के मतदारांना प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांशी या आकडेवारीची तुलना केली जात असल्याने चर्चेला आणखी उधाण आलं आहे. महाराष्ट्रातील १५ लोकसभा मतदारसंघ असे आहेत, जिथे प्रारूप यादीतून वगळलेल्या मतदारांची संख्या २०२४ मध्ये विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे, या १५ पैकी १२ जागांवर २०२४ मध्ये इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, नांदेड, जालना, बीड, लातूर आणि परभणी यांसह काही मतदारसंघांचा यात समावेश आहे. तर संभाजीनगर, जळगाव आणि अकोला या मतदारसंघांत भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता. नाशिकमध्ये तब्बल १०.२७ लाख मतदारांची नावं प्रारूप यादीतून बाहेर आहेत. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचं मताधिक्य सुमारे १.६२ लाख होतं. संभाजीनगरमध्येही अशीच परिस्थिती आहे. इथे ६.०७ लाखांहून अधिक नावं प्रारूप यादीत नाहीत, तर लोकसभा निवडणुकीतील विजयाचं अंतर सुमारे १.३५ लाख मतांचं आहे. एकंदरितच या आकडेवारीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.