भ्रष्टाचाऱ्यांवर ACB चा सर्जिकल स्ट्राईक! १ लाखाची लाच घेणारे नवी मुंबईतील मंडळ अधिकारी, तलाठी अन् महिला मदतनीस रंगेहात अटक!


नवी मुंबई : जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारसांची नोंद करण्यासह मयत भावाचे नाव कमी करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कोप्रोलीचे मंडळ अधिकारी, चिरनेरचे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या खासगी महिला मदतनीसाविरुद्ध उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचेची रक्कम स्वीकारताना महिला मदतनीसासह मंडळ अधिकाऱ्याला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले, तर तलाठ्यालाही द्रोणागिरी येथून ताब्यात घेण्यात आले.


या प्रकरणातील ५२ वर्षीय तक्रारदार यांच्या आई, मावशी, भाऊ आणि बहीण यांच्या सामायिक नावे चिरनेर येथे जमीन आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर मयत बहिणीच्या वारसांची नोंद करण्याबरोबरच मयत भावाचे नाव कमी करण्यासाठी तक्रारदारांनी अर्ज केला होता. या नोंदी करण्यासाठी कोप्रोलीचे मंडळ अधिकारी केशव दगडू मोहिते आणि चिरनेरचे तलाठी जयहिंद बिरशा कोळी यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

याबाबत तक्रारदारांनी १ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी चिरनेर येथील तलाठी कार्यालय आणि कोप्रोली येथील मंडळ अधिकारी कार्यालयात पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान मंडळ अधिकारी मोहिते यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे, तर तलाठी कोळी यांनी लाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदाराला प्रोत्साहन दिल्याचे एसीबीच्या तपासात निष्पन्न झाले. 
त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी कोप्रोली येथील मंडळ अधिकारी कार्यालयात एसीबीने सापळा रचला. यावेळी मोहिते यांनी लाचेची रक्कम आपली खासगी महिला मदतनीस मोनिका विश्नेश पाटील हिच्याकडे देण्यास तक्रारदाराला सांगितले. त्यानुसार तक्रारदाराकडून पाटील हिने एक लाख रुपये स्वीकारले आणि ही रक्कम मोहिते यांच्या ताब्यात दिली.

दुपारी दोनच्या सुमारास एसीबीच्या पथकाने मोहिते आणि पाटील यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारी २.४५ वाजता तलाठी जयहिंद कोळी यांनाही द्रोणागिरी येथून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी मंडळ अधिकारी केशव दगडू मोहिते, तलाठी जयहिंद बिरशा कोळी आणि खासगी महिला मदतनीस मोनिका विश्नेश पाटील यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील सुधारित तरतुदींनुसार उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार बासरे, कदम, नाईक, चौलकर आणि मुकणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.