केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी ५ दिवसांचा आठवडा आणि सर्व शनिवारी सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अर्थ मंत्रालयाने बँकांसाठी ५ दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार आता सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दर शनिवारी अधिकृत सुट्टी असणार आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर मंजुरी मिळाल्याने लाखो कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
५ दिवसांचा आठवडा लागू झाल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या वेळेत काही मिनिटांची वाढ केली जाणार आहे. शनिवारची सुट्टी भरून काढण्यासाठी सोमवार ते शुक्रवार या कामकाजाच्या दिवसांत रोज अतिरिक्त वेळ काम करावे लागणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामकाजाची वेळ ४० मिनिटांनी वाढण्याची शक्यता आहे, जेणेकरून ग्राहकांच्या सेवेवर किंवा कामकाजावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
दर शनिवारी बँकांचे कामकाज बंद असले तरी एटीएम, यूपीआय, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा २४ तास पूर्ववत चालू राहणार आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांना दैनंदिन पैशांच्या देवाणघेवाणीत कोणतीही अडचण येणार नाही. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.