मुंबई: मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याने तीन दिवसांच्या 'कस्टडी पॅरोल'साठी विशेष एनआयए (NIA) न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आपली बंद पडलेली बँक खाती पुन्हा सुरू करणे आणि आधार कार्डशी संबंधित माहिती अपडेट करण्यासाठी थेट उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे सांगत वाझेने ही मागणी केली आहे.
सचिन वाझेने न्यायालयात सादर केलेल्या अर्जात स्पष्ट केले आहे की, त्याची एकूण चार बँक खाती सध्या निष्क्रिय झाली असून ती सुरू करण्यासाठी बँकेमध्ये प्रत्यक्ष जाऊन 'केवायसी' (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. यासोबतच, आपल्या आधार कार्डवरील मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठीही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याची परवानगी त्याने मागितली आहे.
ठाण्यात बंदीची शक्यता असल्याने आधीच कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न
आपल्या अर्जात कारण स्पष्ट करताना वाझेने नमूद केले आहे की, भविष्यात न्यायालयीन प्रक्रियेतून जामीन मंजूर झाल्यास, त्याच्यावर ठाण्यासह इतर काही जिल्ह्यांमध्ये प्रवेश बंदी लागू केली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नंतर ठाण्यात येऊन ही कामे करणे अशक्य होईल, त्यामुळे सध्या कारागृहात असतानाच पोलीस कोठडीत (कस्टडी पॅरोल) ही प्रलंबित कामे उरकून घेण्याची त्याची इच्छा आहे.
कडक बंदोबस्तात कामे करून कारागृहात परतण्याची हमी
वाझेने न्यायालयाला दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की, बँकेचे व्यवहार आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार अपडेटचे काम पोलीस बंदोबस्तात पूर्ण करण्याची त्याची तयारी आहे. दिवसाचे हे कामकाज पूर्ण झाल्यानंतर दररोज संध्याकाळी ठाणे मध्यवर्ती कारागृहात वेळेवर परतण्याची हमीही त्याने दिली आहे. यासाठी तीन दिवसांचा कस्टडी पॅरोल मंजूर करावा, अशी विनंती त्याने विशेष एनआयए न्यायालयाला केली आहे. या अर्जावर न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.