मुंबईत जुहू पोलीस स्टेशनपासून अवघ्या 100 मीटरवर अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार झाला. बाईकवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर दहा गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुखरूप असला तरी त्याचा कारचालक फिरदोस आणि एक रिक्षाचालक जखमी झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी टायगरने स्वतः गाडी चालवल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे घटनास्थळापासून दिग्दर्शक रोहित शेट्टीचे घर अवघे तीनशे मीटरवर आहे. याआधी सलमान खान, रोहित शेट्टी यांच्या घरांवरही गोळीबार झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस आयुक्तांना फोन करून कठोर कारवाईचे निर्देश दिलेत, तर मुंबई पोलिसांची आठ पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा टायगर श्रॉफच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन टायगरची भेट घेत त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच यावेळी त्याच्या कुटुंबियांना धीर देत त्यांनी टायगर श्रॉफला सुरक्षिततेबाबत आश्वस्त केले. टायगर श्रॉफ यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी असून, या हल्ल्यामध्ये तो सुदैवाने वाचला आहे असे सांगितले.
या हल्ल्यानंतर त्याचा संपूर्ण परिवार सध्या दहशतीखाली आणि चिंतेत आहे. या घटनेनंतर आपण स्वतः त्याची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मात्र याच दरम्यान ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी पोस्ट करत महत्वाचं विधान केलं आहे.
राम पूर्णेकरने व्यक्त केला संताप-
ठाण्याच्या मानपाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राचे वार करून हत्या करण्यात आली होती. प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येनंतर ठाण्यात एकच खळबळ उडाली. सदर घटनेनंतर अद्यापही ठाण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्णेकरांच्या घरी गेले नाहीत. मात्र काल टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर तातडीने एकनाथ शिंदे त्याच्या घरी गेले. त्यामुळे राम पूर्णेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मनातला राग व्यक्त केला. टायगरची भेट घ्यायला पोहोचले पण प्रदीप पूर्णेकर यांच्याकडे यायला वेळ नाही, यालाच म्हणतात मीनाक्षी राजा पर्व असे लिहून राम पूर्णेकर याने संताप व्यक्त केला. पूर्णेकर हत्याकांडनंतर अजूनही एकनाथ शिंदे त्यांच्या घरी गेलेले नाहीत. 18 दिवस उलटले तेव्हा मंत्री प्रताप सरनाईक फक्त भेटून आले. पूर्णेकर कुटुंबीयांनी अनेक वेळा मागणी करूनही शिंदे किंवा त्यांचा कोणीही मोठा नेता, जिल्हा प्रमुख खासदार नरेश म्हस्के, शहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख कोणीच पूर्णेकर यांच्या घरी गेले नाही.
टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली-
टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांची आठ पथकं आरोपींच्या शोधासाठी कुर्ला, वांद्रे, कल्याण आणि दादर रेल्वे स्थानक येथे रवाना झाली आहेत. घटनेनंतर टायगर श्रॉफकडेही पोलिसांनी जुजबी चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. तर सात गोळ्यांच्या पुंगळ्या पोलिसांनी घटनास्थळाहून ताब्यात घेतल्यात न्यायवैद्यक प्रयोगशाळेत या पुंगळ्या पाठवून तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, बिश्नोई गँगने एक ऑडिओ क्लिप जारी करत टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेतलीच, पण या ऑडिओ क्लिपमधून लॉरेन्स गँगने सलमान खानला धमकी दिली. लॉरेन्स गँगने याआधी सलमान खानच्या घरावरही गोळीबार केला होता. आता पुन्हा धमकी दिल्यानं खळबळ उडाली. अनिल पंडीत आणि हरमन संधू नावाच्या व्यक्तींनी या घटनेची जबाबदारी घेतली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.