सांगली :- चरित्राचा संशय, मुलाच्या अपेक्षेवरून आणि माहेरून पैसे आणण्याच्या त्रासातून पत्नीचा बांबूने डोक्यात मारून निर्घृण खून करणाऱ्या पतीला सांगलीच्या जिल्हा व अति. सत्र न्यायालयाने जन्मठेपेची आणि १०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मा. जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश क्र. ७ एम. एस. काकडे यांनी आज (दि. ३० ऑक्टोबर २०२६) हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
घटनेची पार्श्वभूमी व हकीकत:
आरोपी कुमार भीमराव जाधव (वय ३८, मूळ रा. बामणोळी दत्तनगर, जि. सांगली) आणि मयत सुनंदा कुमार जाधव (वय ३०) हे पती-पत्नी होते. आरोपी कुमार याला सुनंदा यांच्यापासून तीन मुली होत्या, मात्र मुलगा होत नसल्याच्या कारणावरून तसेच वडीलांकडून आणखी पैसे आणण्यासाठी तो सुनंदा यांना सतत मानसिक व शारीरिक त्रास देत असे.
यापूर्वीही या त्रासाबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता. दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास बामणोळी येथील भाड्याच्या घरात दोघांमध्ये घरगुती कारणांवरून व पैशांच्या मागणीवरून पुन्हा वाद झाला. या वादातून चिडून जाऊन आरोपी कुमार जाधव याने पत्नी सुनंदा यांच्या डोक्यात बांबूने गंभीर वार करून त्यांचा जागीच खून केला.
न्यायालयाचा निकाल:
एमआयडीसी पोलीस ठाण्यात (गु.र.नं. २६४/२०२२) गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी तपास करून ३१ डिसेंबर २०२२ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र (१३५/२०२२) दाखल केले होते.
कोर्टात चाललेल्या सुनावणीत सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून मा. न्यायाधीश एम. एस. काकडे यांनी आरोपी कुमार जाधव याला खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
भा.दं.वि. कलम ३०२ (खून): जन्मठेपेची शिक्षा आणि १०,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरी).
भा.दं.वि. कलम ४९८(अ) (छळ): ३ वर्षे सक्तमजुरी.
दोन्ही मुख्य शिक्षा एकाच वेळी (संचलित) भोगायच्या आहेत.
पोलीस यंत्रणा व पैरवी पथक:
सदर खटल्यामध्ये जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद अंकुश भोकरे यांनी प्रभावी सरकारी पक्ष मांडला. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी स.पो.नि. एम. एस. शेख, म.पो.शि. यास्मिन शेख (एमआयडीसी पो. ठाणे), म.पो.ह. व्हि. बी. मिसाळ, म.पो.शि. अर्चना कांबळे आणि कोर्ट ऑर्डरली पो.हे.काँ. पी. एम. मिरजी यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.