लातूर रक्तरंजित! कोल्हापूरच्या प्राध्यापकाचा काटा काढला; अनैतिक संबंधातून थरारक अपहरण अन हत्या, ४ नराधम गजाआड!
लातूर: अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ३४ वर्षीय प्राध्यापकाचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना लातूरमध्ये समोर आली आहे. कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले माधव संगमे (वय ३४, रा.लातूर) असं हत्या झालेल्या प्राध्यापकाचं नाव आहे. याप्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
घरासमोरून अपहरण करून बीडमध्ये बेदम मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर शहरातील कनेरी चौक परिसरातील राहत्या घरासमोरून आरोपींनी माधव संगमे यांचं बळजबरीनं अपहरण केले. तिथून त्यांना थेट बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील एका खडी क्रशरवर नेण्यात आलं. तेथे आरोपींनी संगमे यांना लाठ्या-काठ्यांनी आणि अमानुषपणे बेदम मारहाण केली. या जीवघेण्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने माधव संगमे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
बहिणीशी प्रेमसंबंधाच्या संशयातून हत्याकांड
आरोपींच्या बहिणीसोबत माधव संगमे यांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. याच रागातून आणि संशयातून हे अपहरण आणि हत्येचं षड्यंत्र रचण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
चार आरोपी अटकेत, गुन्हा कबूल
५ ऑक्टोबरच्या पहाटे या भयानक घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने सूत्रे हलवत तपास सुरू केला. पोलिसांनी मुख्य आरोपी पृथ्वीराज देशमुख आणि धवल देशमुख यांच्यासह त्यांचे साथीदार प्रथमेश रेड्डी व आदित्य भालके या चौघांनाही तात्काळ ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्या माहिती पोलिसांनी दिली आहे.मृत माधव संगमे हे कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार असून या घटनेमुळे संगमे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कामत करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.