उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथे एकाच कुटुंबातील पाच जणांच्या संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता या सामूहिक मृत्यूप्रकरणी अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. यामुळे या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. सुरुवातीला हा प्रकार फूड पॉयझनिंगचा वाटत होते. मात्र नंतर, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तर काही औरच समोर आले.
नेमकं काय घडलं? -
रबुपुरा परिसरातील नगला श्री पदम गावात शुक्रवारी रात्री महेश, त्यांची पत्नी ललिता (३५) आणि तीन मुले - मिष्टी (७), लड्डू (११) आणि साक्षात (३) यांनी रात्री मॅगी खाल्ली आणि झोपले. मात्र, शनिवारी सकाळी त्यांच्या खोलीत पाचही जणांचे मृतदेह आढळून आले. सुरुवातीला, अन्नातून विषबाधा अर्थात Food Poisoning झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र नंतर, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये शरीरात विष गेल्याचे समोर आले आणि प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.
वडिलांनीच मॅगीत विष मिसळले - एनडीटीव्हीने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, महेशनेच (वडील) मॅगीमध्ये विष मिसळले होते, यामुळे पाचही जणांचा मृत्यू झाला. महेशच्या फोनमध्ये एक ऑडिओ रेकॉर्डिंग आढळून आली आहे. यात त्याने आपल्या दोन बहिणी आणि भावोजींना या मृत्यूंसाठी जबाबदार धरले आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
संपत्तीच्या वादातून मृत्यू -
रबुपुरा पोलीस ठाण्याचे एसएचओ सुजीत उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नातेवाईकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन बहिणी आणि भावोजी अशा तिन्ही आरोपींना अटक केली आहे. मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय आहे.दरम्यान, महेश मानसिक तणावात आणि नैराश्यात असल्याने त्याने हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी नमुने फोरेंसिक तपासणीसाठी पाठवले असून, अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, या प्रकरणी कसून चौकशी सुरू असून लवकरच संपूर्ण सत्य समोर येईल, असे एसीपी ग्रेटर नोएडा राजीव सिसोदिया यांनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.