कोल्हापूर : गोकुळ दूध संघावर गेल्या अनेक वर्षांपासून महाडिक घराण्याचं वर्चस्व असून यंदाच्या निवडणुकीतून सतेज बंटी पाटलांनी समविचारी आघाडीची सत्ता स्थापन केल्याने महायुतीला मोठा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे, गोकुळच्या निवडणुकीत पारंपरिक राजकीय घराण्यातील दिग्गज मंडळीही मैदानात होती. मात्र, महायुतीच्या दोन नेत्यांना मतदारांनी चांगलाच दणका दिलाय. येथील निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव पराभूत झाल्यानंतर आता शौमिका महाडिक यांचाही पराभव झाला आहे. शौमिका महाडिकांना 7 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्याचे समजते. राज्याचं लक्ष लागलेल्या आणि अनेक मंत्र्यांची फौज मैदानात उतरलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते बंटी पाटील यांची शिट्टी वाजल्याचं पाहायला मिळत आहे.
महायुतीला धक्क्यावर धक्के बसत असून गोकुळ दूध संघात संचालिका असलेल्या शौमिका महाडिकांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला. महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून शौमिका अमल महाडिक उमेदवार होत्या, त्यांच्याविरुद्ध काँग्रेसप्रणित सतेज पाटील यांची राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार होते. येथे 100 टक्के मतदानानंतर आज आलेल्या निकालात शौमिका महाडिक यांचा 7 मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे, महाडिक कुटुंबासह भाजपा महायुतीला हा मोठा धक्का मानला जातो. मात्र, शौमिका महाडिक यांनी रिकाऊंटींगची मागणी केली असून पुढील काही तासांत अंतिम चित्र स्पष्ट होईल.
कोण आहेत शौमिका महाडिक
शौमिका महाडिक या भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक हे त्यांचे सासरे तर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे त्यांचे दीर आहेत. शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचं माजी अध्यक्षपद भूषवलं आहे. त्या जिल्हा परिषद सदस्यही होत्या. याशिवाय शौमिका महाडिक भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत.
गत निवडणुकीत 43 मतांनी विजय
दरम्यान, गोकुळ दूधसंघाच्या गत निवडणुकीत 2022 मध्ये महाडिक गटाकडून त्यांनी 43 मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी शौमिका महाडिक आणि सतेज पाटील-मुश्रीफ गटाच्या अंजना केदारी रेडेकर यांच्यात चुरस झाली होती. शौमिका महाडिक पहिल्यांदाच गोकुळच्या संचालक म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, यंदा सतेज पाटील विरुद्ध महायुती असा रंगतदार सामना पाहायला मिळाला. त्यामध्ये, शौमिका महाडिकांना पराभवाचा सामना करावा लागला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.