ईश्वरपूर :- सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बडगा उगारला आहे. ईश्वरपूर शहरातील गांधी चौक परिसरात विनापरवाना देशी पिस्टल बाळगणाऱ्या एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला एलसीबीच्या पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून तब्बल ८१ हजार रुपयांचा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे.
काय आहे नेमकी घटना?
पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यात शरीराविरोधातील गंभीर गुन्हे व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम सुरू आहे.
दरम्यान, ईश्वरपूरमधील बंद पडलेल्या जलतरण तलावाजवळ एक रेकॉर्डवरील संशयित इसम कमरेला पिस्टल लावून उभा असल्याची गोपनिय माहिती LCBचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकातील पोहेकों हणमंत लोहार आणि विटा पोलीस ठाण्याचे पोहेकों महेश संकपाळ यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकाने तातडीने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. निगराणी दरम्यान संशयास्पदरीत्या थांबलेल्या अबुबकर हारुणरशीद मणेर (वय २६, रा. मणेर गल्ली, गांधी चौक, ईश्वरपूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या पाठीमागे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि मॅगझीनमध्ये जिवंत काडतूस मिळून आले.या शस्त्राचा परवाना मागितला असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. हे पिस्टल स्वतःच्या सुरक्षेसाठी विकत घेतल्याची कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी ८० हजार रुपये किमतीचे पिस्टल व १ हजार रुपयांचे जिवंत काडतूस असा एकूण ८१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
रेकॉर्डवरील गुन्हेगार:
अटक करण्यात आलेला अबुबकर मणेर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही आर्म अॅक्ट आणि घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोहेकों हणमंत लोहार यांच्या फिर्यादीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम (आर्म अॅक्ट) कलम ३, २५ सह मपोका ३७(१)(३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ईश्वरपूर पोलीस करत आहेत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवरचकता ठेवण्यासाठी अशाच प्रकारची धडक मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती LCB प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.