🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"गाडीत आराम करतो, मला उशी द्या..." मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे शेवटचे शब्द; हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू

"गाडीत आराम करतो, मला उशी द्या..." मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे शेवटचे शब्द; हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू


मुंबई : मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड यांच्या आकस्मिक निधनाने पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे. कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले गायकवाड हे नवी मुंबईतील उलवे येथील निवासस्थानातून कर्तव्यावर येत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली.



त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड यांनी आदल्या दिवशी संध्याकाळी पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांचा वाढदिवस साजरा केला होता. 




त्यानंतर ते उलवे येथील घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते चालक आणि ऑपरेटरसह कुरार पोलीस ठाण्याकडे निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी सहकाऱ्यांना याबाबत सांगितले. प्रकृती ठीक नसल्याने गाडीतच थोडा वेळ आराम करण्यासाठी त्यांनी उशी मागितली आणि ते झोपले.

गाडी कुरार पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर चालकाने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने चालक आणि ऑपरेटर यांनी त्यांना तपासले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच दोघांनीही तातडीने मालाडमधील पठाणवाडी येथील डीएनए रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलातील सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 




विशेष म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी जाधव यांचेही निधन झाले होते. अवघ्या सात महिन्यांपूर्वी सुशील कुमार गायकवाड आणि शिवाजी जाधव या दोघांनाही पोलीस निरीक्षक पदावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली होती. दरम्यान, कामाचा ताण आणि वरिष्ठांचा दबाव यामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, गायकवाड यांच्या निधनामागे कामाचा ताण हे कारण असल्याचे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.