महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कंत्राटी पदावर गेली अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्या तब्बल १५,००० ते १८,००० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना आता अधिसंख्य पदावर सामावून घेत, लवकरच अधिकृत नियुक्ती आदेश वाटप केले जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी मुंबईत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, यामुळे यंदाच्या दिवाळीत हजारो कर्मचाऱ्यांची 'खरी दिवाळी' गोड होणार आहे.
मुंबईत होणार भव्य दिव्य सोहळा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने या विशेष कार्यक्रमाच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या या सोहळ्यात मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश सुपूर्द केले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून सुमारे १५,००० ते १८,००० अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असल्याने, भव्य मैदान आणि तेथे आवश्यक त्या सर्व मूलभूत सेवा-सुविधा (जसे की पिण्याचे पाणी, वाहनतळ, सुरक्षा आणि बसण्याची व्यवस्था) उपलब्ध करून देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून तातडीने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वर्षानुवर्षांच्या लढ्याला आणि प्रतीक्षेला पूर्णविराम
आरोग्य विभागाच्या विविध योजनांमध्ये आणि आरोग्य केंद्रांवर अहोरात्र सेवा देणारे हे कंत्राटी कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून आपल्या नोकरीच्या सुरक्षिततेसाठी आणि अधिसंख्य पदावर सामावून घेण्यासाठी लढा देत होते. त्यांच्या या प्रदीर्घ मागण्यांवर अखेर शासन स्तरावर सकारात्मक निर्णय झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये व त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.कंत्राटी स्वरूपाच्या अनिश्चिततेतून बाहेर पडून अधिसंख्य पदावर कायम होण्याचा हा आदेश मिळणे, हा या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असून, यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आनंदाची आणि उत्साहाची ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.