सांगली : सांगलीतील हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत (वय १४) याचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या निलेश गडदे, म्हमद्या नदाफसह टोळीला जामीन मंजूर झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
टोळीला ‘मोक्का’च्या कचाट्यात पकडल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यासाठी मिळालेली मुदतवाढ निश्चित न्यायालयीन प्रक्रियेतून मिळाली नसल्याचे आरोपींच्या वकिलांनी निदर्शनास आणत जोरदार युक्तिवाद केला. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने टोळीचा जामीन मंजूर केला. रेल्वेच्या मालधक्क्यावरील कामावरून लक्ष्मण खरात आणि गुंड निलेश गडदे यांच्या गटात वाद झाला होता. त्यातूनच गडदेने खरातच्या घरात जाऊन पत्नीला धमकावले. त्यामुळे जत परिसरातील हमाल गडदे टोळीवर कारवाईच्या मागणीसाठी दि. १२ जून रोजी सकाळी एकवटले. सांगलीतून हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर तेथे गेले. जत पोलिस ठाण्यासमोर दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला.
त्यातून गडदेच्या गाडीवर दगडफेक झाल्यामुळे तो तेथून निघाला. बाळासाहेब बंडगर यांच्यामुळेच हा प्रकार घडल्याच्या रागातून त्यांना मारण्यासाठी तो सांगलीत आला. बंडगर घरात नसल्याचे पाहून दारात खेळणाऱ्या नातू वेदांत बंडगर याच्यावर गोळी झाडली. या खून प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले.पोलिसांनी निलेश गडदे, गुंड म्हमद्या नदाफसह टोळीला जेरबंद केले. तसेच आठजणांच्या टोळीला मोक्का लावला. सध्या टोळी कारागृहात आहे. या टोळीने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. कोल्हापुरात सर्किट बेंचसमोर जामिनाच्या मुद्यावर आरोपींच्या वकिलांनी तपासासाठी दिलेल्या मुदतवाढीचा तांत्रिक मुद्दा मांडला. टोळीविरुद्ध मोक्का लागल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यासाठी तपासासाठी ९० दिवसांपेक्षा जास्त मुदतवाढ मागितली.परंतू ही मुदतवाढ योग्य न्यायालयीन प्रक्रियेतून झाली नाही. तपास अधिकाऱ्यांऐवजी सरकारी वकिलांनी त्यांच्या अभिप्रायासह मुदतवाढ मागणे आवश्यक होते. याची अंमलबजावणी झाली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सर्किट बेंचने सांगलीतील सत्र न्यायालयाने पोलिसांना दिलेली मुदतवाढ बेकायदेशीर ठरवून ती रद्द केली. तसेच वेळेत आरोपपत्र दाखल न झाल्यामुळे गुरूवारी टोळीचा ‘डीफॉल्ट’ जामीन मंजूर केला. त्यामुळे पोलिसांची धावपळ वाढली असून जामीन रद्दसाठी सर्वोच्च न्यायालयात अपिल करणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. जामीन रद्दसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज निलेश गडदेला पूर्वीच्या खून प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तेव्हा महापालिका क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. त्याचे त्याने उल्लंघन केले. तसेच वेदांतचा खून केला. त्यामुळे त्याचा जामीन नामंजूर करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.