दोन राज्यांच्या चेकपोस्ट चकवून सांगलीत घुसलेली ११ लाखांची बेकायदेशीर दारू सोडलीच कशी? आयुक्तांनी तातडीने लक्ष न दिल्यास जनक्षोभ उसळणार; सामान्य नागरिकांचा संतप्त सवाल! मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारभार सध्या पूर्णपणे रामभरोसे चालला असल्याचे समोर आले असून, अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन राज्यांच्या सीमा आणि हजारो तपासण्या चुकवून तब्बल ११ लाख रुपयांची बेकायदेशीर दारू थेट सांगली जिल्ह्यापर्यंत पोहोचतेच कशी, असा सवाल उपस्थित होत असतानाच, ही दारू पकडल्यानंतर आरोपींवर कठोर कारवाई करण्याऐवजी फक्त नोटीस देऊन सोडण्याचा पराक्रम या विभागाने केला आहे.
पीसी घेणार की तपास गुंडाळणार?
एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारूचा साठा जप्त झाल्यानंतर आरोपींना जामिनावर सोडण्यात कोणाचे हितसंबंध जडले आहेत? आता सोडलेल्या आरोपींना पुन्हा ताब्यात घेऊन त्यांची पोलीस कस्टडी (PC) घेऊन यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जाणार, की वरिष्ठांच्या आशीर्वादाने हा संपूर्ण तपासच गुंडाळून टाकला जाणार? असा रोखठोक सवाल नागरिक विचारत आहेत.
सामान्यांना त्रास, पण माफिया मोकाट!
एकीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या अडवून, कागदपत्रांच्या नावाखाली त्यांना नाहक त्रास दिला जातो, दंड ठोठावला जातो; तर दुसरीकडे ११ लाखांचा अवैध दारूचा साठा वाहून नेणाऱ्या माफियांना मात्र पायघड्या घातल्या जातात. उत्पादन शुल्क विभागाच्या या दुटप्पी आणि संशयास्पद कारभारामुळे भ्रष्टाचाराची मोठी दुर्गंधी येत असल्याची चर्चा रंगली आहे.
आयुक्त महोदय दखल घेणार का?
दोन राज्यांचे चेकपोस्ट पार करून सांगलीत दारू येतेच कशी, या अपयशाची आणि पकडलेल्या आरोपींना अभय देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ आयुक्तांनी या अनागोंदी कारभाराची तात्काळ गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता मिरज आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांमधून होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.