🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत 'सेवा संकल्प अभियाना'तून २०८ बालकांची मोफत २D इको तपासणी; ४८ जणांवर होणार मुंबईत मोफत हृदयशस्त्रक्रिया!

सांगलीत 'सेवा संकल्प अभियाना'तून २०८ बालकांची मोफत २D इको तपासणी; ४८ जणांवर होणार मुंबईत मोफत हृदयशस्त्रक्रिया!


​मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते शिबीराचा शुभारंभ राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बाळांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सांगली जिल्हा प्रशासनाचा मोठा पुढाकार येत्या १३ ऑक्टोबरला बालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

​
सांगली :- राज्य शासनाच्या "सेवा संकल्प अभियाना"ंतर्गत आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाद्वारे बालकांसाठी मोफत २D इको तपासणी शिबीर उत्साहात पार पडले. जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांमधून संदर्भित केलेल्या २०८ संशयित बालकांची यावेळी तज्ज्ञांकडून मोफत तपासणी करण्यात आली. यापैकी ४८ बालकांवर मुंबई येथील रुग्णालयात मोफत हृदयशस्त्रक्रिया केली जाणार आहे. 
​शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या शुभहस्ते झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या संयुक्त समन्वयातून या यशस्वी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईतील बालाजी हॉस्पिटलच्या पथकाकडून तपासणी

​मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलच्या बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री मिश्रा यांनी उपस्थित २०८ बालकांची २D इको तपासणी केली, तर व्यवस्थापक प्रतिक मिश्रा यांनी रुग्णालयाच्या वतीने समन्वय साधला. शिबीरात ० ते १८ वयोगटातील बालकांचा समावेश होता, ज्यामध्ये ६ वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांची संख्या लक्षणीय होती.

​शिबीराचा मुख्य निष्कर्ष आणि पुढील उपचार:
४८ बालकांवर हृदयशस्त्रक्रिया: आवश्यक आढळलेल्या ४८ बालकांना तात्काळ मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या बालकांचा प्रवास, निवास आणि भोजन व्यवस्था पूर्णपणे मोफत असेल.

​औषधोपचार व पाठपुरावा: ३५ बालकांवर आवश्यकतेनुसार हृदयरोगाचे औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत, तर ४० बालकांना पुढील ६ महिन्यांनंतर पुन्हा तपासणीचा सल्ला देण्यात आला आहे.
सांगली जिल्हा राज्यात अग्रस्थानी

​उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी पालक आणि बालकांना धीर देत यशस्वी शस्त्रक्रियांसाठी शुभेच्छा दिल्या. सांगली जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात राज्यात नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. आजवर जिल्ह्यातील १,९५० बालकांवर यशस्वी 
हृदयशस्त्रक्रिया तर २५,३३४ बालकांवर इतर विविध शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळांची आरोग्य तपासणी व १००% संदर्भसेवा पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

​हे शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस यांच्यासह DEIC पथकातील डॉ. परशुराम हरणे, अनिरुद्ध लोंढे, रोहित चौगुले, जीवन कांबळे, इंदू पाटील, शीतल कुंभार, वर्षा चव्हाण व सत्यजित बडेर यांनी विशेष परिश्रम घेतले.

​१३ ऑक्टोबरला मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर!
सेवा संकल्प अभियानांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील नेत्रदोष किंवा डोळ्यांच्या समस्येने ग्रस्त बालकांसाठी मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी सिव्हिल हॉस्पिटल, सांगली येथे 'मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर' आयोजित करण्यात आले आहे. सर्व गरजू बालकांनी व पालकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी केले आहे.

​

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.