🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाखोंचा गल्ला...! प्रसिद्ध संदीप हॉटेलवर आयकर विभागाचे छापे; रात्रभर सुरु होती चौकशी...

लाखोंचा गल्ला...! प्रसिद्ध संदीप हॉटेलवर आयकर विभागाचे छापे; रात्रभर सुरु होती चौकशी...


अहिल्यानगर आणि पुणे परिसरात लोकप्रिय असलेल्या 'संदीप उद्योग समूहा'वर आयकर विभागाने मोठा छापा टाकला आहे. बुधवारी (दि. १४) सकाळी ८ वाजेच्या सुमारास पुणे येथील आयकर विभागाच्या पथकानेअहिल्यानगरमध्ये एकाच वेळी विविध ठिकाणी धाडी टाकत तपासणी सुरू केली. ही झाडाझडती सलग १२ तासांहून अधिक काळ म्हणजेच रात्री उशिरापर्यंत सुरू होती. संदीप उद्योग समूहाची अहिल्यानगरमधील पुणे रस्त्यावर 'हॉटेल सचिन', 'हॉटेल उदयनराजे' आणि 'संदीप प्राईड' अशी तीन नामांकित हॉटेल्स आहेत. याव्यतिरिक्त पुण्यातही या समूहाची हॉटेल्स कार्यरत आहेत.

निवासस्थानासह व्यवस्थापक आणि बांधकाम व्यावसायिकावरही कारवाई आयकर विभागाच्या पुणे पथकाने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवली. पथकातील एका तुकडीने सकाळीच संचालक कोतकर यांच्या केडगाव येथील निवासस्थानी पोहोचून तपासणी सुरू केली. केवळ हॉटेल्सच नव्हे, तर हॉटेलच्या व्यवस्थापकाचे घर तसेच समूहाशी संबंधित केडगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावरही पथकाने छापे टाकले.

एकाच वेळी झाडाझडती सकाळी आठ वाजल्यापासून तिन्ही हॉटेल्स, कार्यालये आणि संबंधित व्यक्तींच्या घरांवर विविध पथकांकडून कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल डेटाची कसून तपासणी करण्यात आली. हेलिकॉप्टर खरेदीमुळे आले होते चर्चेत संदीप उद्योग समूहाची हॉटेल्स त्यांच्या जेवणासाठी अत्यंत प्रसिद्ध असून अहिल्यानगर तसेच पुण्यात जेवणासाठी खवय्यांचे तासंतास वेटिंग असते. दरम्यान, गेल्या वर्षी कोतकर कुटुंबीयांनी ७ सीटर हेलिकॉप्टर खरेदी केले होते, ज्यामुळे हा उद्योग समूह संपूर्ण राज्यात चर्चेत आला होता. आयकर विभागाने केलेल्या या अचानक कारवाईमागील नेमके कारण किंवा किती रुपयांची बेहिशोबी मालमत्ता अथवा करचोरी समोर आली, याबाबत अद्याप आयकर विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.