अहिल्यानगर : कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरात एका भव्य उद्घाटन सोहळ्यादरम्यान चोरट्याने धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी नवीन वस्त्रदालनाचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडत असताना गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने नागरिकांच्या खिशात हात घालून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला.
नागरिकांनी चोरट्याला पकडले असता पोलीस येत असताना त्याने हाताला हिसका देऊन तिथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी देखील त्याच्या मागे धाव घेतल्याने या कार्यक्रमात चोर - पोलिसांचा थरार पाहायला मिळाला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
नेमकं काय घडलं?
या कार्यक्रमाला आमदार विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. याचवेळी विराज हाइट्स या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही सुरू होता. परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमली होती. याच गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने काही नागरिकांच्या खिशात हात घालून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तर काहींच्या खिशातून पैसे काढल्याची माहिती समोर आली आहे.
चोराची संरक्षण भिंतीवरुन उडी
दरम्यान, एका ठिकाणी नागरिकांनी चोरट्याला पकडले. मात्र त्याने हिसका देऊन पळ काढला यावेळी गोंधळ सुरू झाला. पोलिसांनी चोरट्याच्या मागे धाव घेतली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ चोर-पोलिसांचा थरार पाहायला मिळाला. मात्र, पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी चोरट्याने एका घराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारली आणि तेथून पळ काढला.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
विशेष म्हणजे, पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी आणि मान्यवर तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच अशा प्रकारे चोरीचे प्रयत्न झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोठ्या कार्यक्रमांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे. गर्दीचा फायदा घेणाऱ्या चोरट्यांची मजल आता थेट मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत पोहोचली आहे का? अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन काय पावले उचलणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारीवर सुजय विखे पाटील यांनी केलेलं भाष्य
दरम्यान, नुकतंच काही दिवसांपूर्वी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर भाष्य केलं होतं. गुन्हेगारीच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असं सुजय विखे म्हणाले होते. गुन्हेगार तलवार घेऊन किंवा गावठी कट्टा घेऊन फिरतात, अशी तक्रार घेऊन काही जण माझ्याकडे येतात. पण आपले नाव कुठे येऊ नये, असं ते म्हणतात. कुणालाही आपलं नाव पुढे यावं असं वाटत नाही. पण गुन्हेगारी साफ करायची आहे. आपल्याला कुणाची पर्वा नाही. गुन्हेगारीच्या विरोधात कठोर कारवाई सुरुर राहणार. गुंड संपवण्यासाठी गुंडच लागतो आणि तो गुंड मी असल्याचं सुजय विखे म्हणाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.