मागील काही दिवसांपासून देशात 'एसआयआर' आणि निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता ओडिशाचे मुख्य निवडणूक अधिकारी आर. संथन गोपालन यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे.
ओडिशा केडरच्या २००१ बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या गोपालन यांनी राज्यात एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरात, बुधवारी (३० सप्टेंबर) हा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामागे वैयक्तिक अडचणी आणि प्रकृतीचे कारण असल्याचे स्पष्ट करत, आपल्या स्वेच्छानिवृत्तीचा सुरू असलेल्या एसआयआर वादाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.तामिळनाडूचे रहिवासी असलेले गोपालन जुलै २०२४ पासून ओडिशाचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे उत्पादन शुल्क विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही आहे. ते जून २०२८ मध्ये सेवानिवृत्त होणार होते. त्यांनी म्हटले आहे की, स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा त्यांचा निर्णय राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनासंदर्भात (SIR) सुरू असलेल्या वादाशी संबंधित नाही. गोपालन यांच्या सेवेचे अंदाजे १८ महिने शिल्लक आहेत. ते गेल्या अनेक महिन्यांपासून नोकरी सोडण्याचा विचार करत होते.
मला वैयक्तिक कारणांसाठी स्वेच्छानिवृत्ती घ्यायची आहे
ते म्हणाले,एसआयआर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि सुधारित मतदार यादी प्रसिद्ध होईपर्यंत मी हा निर्णय पुढे ढकलला होता. "मला वैयक्तिक कारणांसाठी स्वेच्छानिवृत्ती घ्यायची आहे. मला वैयक्तिक बाबींवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मी माझ्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करेन आणि माझ्या मुलाचे शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत भुवनेश्वरमध्येच राहीन, असेही ते म्हणाले." एसआयआर प्रक्रियेवरून विरोधकांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीशी त्यांच्या या निर्णयाचा संबंध आहे का, असे विचारले असता, गोपालन म्हणाले, "त्यांना आनंद मानायचा असेल तर मानू द्या. २ सप्टेंबर रोजी माझ्या शासकीय सेवेची २५ वर्षे पूर्ण झाली आणि म्हणूनच मी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.