🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नूतन जिल्हा बँक अध्यक्षांच्या निवडीला अवघ्या तासाभरातच वादाचे गालबोट; पत्रकारांशी अरेरावी केल्याचा आरोप

नूतन जिल्हा बँक अध्यक्षांच्या निवडीला अवघ्या तासाभरातच वादाचे गालबोट; पत्रकारांशी अरेरावी केल्याचा आरोप


सांगली: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी महेंद्र (आप्पा) लाड यांची निवड होताच, अवघ्या तासाभरातच या निवड प्रक्रियेला वादाचे गालबोट लागल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. नूतन अध्यक्षांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी एका पत्रकाराशी अरेरावीची भाषा वापरून अपमानित केल्याचा आरोप स्थानिक पत्रकार वर्तुळातून केला जात आहे.




​मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड जाहीर झाल्यानंतर परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी वार्तांकनासाठी उपस्थित असलेल्या एका पत्रकाराशी बोलताना ऋषिकेश लाड यांनी आक्रमक पवित्रा घेत, "तू कोणत्या प्रकारचा पत्रकार आहेस?" अशा शब्दांत विचारणा करत अरेरावीची भाषा वापरल्याचे उपस्थित पत्रकारांकडून सांगण्यात येत आहे. ​




अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन एक तासही उलटला नसताना थेट लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवरच अशा प्रकारची भाषा वापरली गेल्याने जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. "जर वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाच अशा प्रकारच्या वागणुकीला सामोरे जावे लागत असेल, तर पत्रकारांना यापुढे वेगळा विचार करावा लागेल," अशा संतप्त भावना काही पत्रकारांनी व्यक्त केल्या आहेत. 




दिवसभर जिल्ह्याच्या राजकीय आणि माध्यम वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती. दरम्यान, या घटनेवर ऋषिकेश लाड किंवा नूतन अध्यक्ष महेंद्र लाड यांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. पत्रकार संघटनांकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात असून, यावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.