सांगलीत दिवाळी पाडव्याच्या पहाटे रक्ताची उधळण! हॉटेल मालकाशी वादातून ३६ वर्षीय तरुणाचा अमानुष खून; नवी मुंबई पोलिसातील कर्मचाऱ्याचा समावेश?
सांगलीवाडीतील 'हॉटेल अनुयश' येथे थरार: लाथाबुक्क्यांनी मारहाण करत भिंतीवर अन् शटरवर आपटून भावाचा डोळ्यादेखत घेतला बळी; एका संशयिताने दाखवले पोलिस ओळखपत्र!
सांगली :- ऐन दिवाळी पाडव्याच्या आनंदोत्सवात सांगली शहर व परिसर एका धक्कादायक आणि सुन्न करणाऱ्या घटनेने हादरून गेला आहे. सांगली-अष्टा रस्त्यावरील सांगलीवाडी हद्दीतील 'हॉटेल अनुयश' येथे किरकोळ वादातून एका ३६ वर्षीय तरुणाची लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करत आणि भिंतीसह लोखंडी शटरवर डोके व शरीर आपटून निघृण हत्या करण्यात आली. विजय वसंत पाटील (वय ३६, रा. अमर चौक, धनगर गल्ली, सांगलीवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याचा दावा करणाऱ्या एका संशयितासह तिघांविरुद्ध सांगली पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पाडव्याच्याच दिवशी घडलेल्या या हत्याकांडामुळे सांगलीवाडी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नक्की काय घडली घटना?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत विजय पाटील हा शेती व्यवसाय करत होता. सोमवारी (दि. ९ नोव्हेंबर) रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास विजय आणि त्याचा मित्र विशाल काटकर हे दोघे सांगली-अष्टा रोडवरील 'हॉटेल अनुयश' येथे जेवणासाठी गेले होते.
त्यादरम्यान विजय पाटील आणि हॉटेल मालक हरीदास पाटील (रा. सांगलीवाडी) यांच्यात कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद सुरू झाला. हॉटेल मालक हरीदास पाटील हे विजय याला मोठ्याने शिवीगाळ करत होते.
दरम्यान, रात्री १२.२५ वाजण्याच्या सुमारास मृत विजयचा भाऊ विशाल वसंत पाटील (वय ३०, व्यवसाय-सेंट्रिंग) हा त्याचे मित्र प्रकाश मारुती भानुसे (रा. विजय कॉलनी) व पवन कोळी (रा. कोळीवाडा, सांगलीवाडी) यांच्यासह त्याच हॉटेलमध्ये जेवणासाठी पोहोचला. भावाचा वाद सुरू असल्याचे दिसताच विशाल व त्याचे मित्र भांडण सोडवण्यासाठी तेथे गेले.
अमानुष मारहाण; शटरवर आपटून केली हत्या!
विशाल पाटील व त्याचे मित्र मध्यस्थी करत असतानाच, हॉटेल मालक हरीदास पाटील यांच्या बाजूने आलेल्या तीन अनोळखी इसमांनी विजय पाटील याला पकडून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. विशाल, त्याचे मित्र, विशाल काटकर आणि हॉटेलमधील वेटर भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, उन्मादाने पेटलेल्या आरोपींनी विजय याला लाथाबुक्क्यांनी बदडत थेट हॉटेलच्या भिंतीवर आणि लोखंडी शटरवर जोराने आपटले. यात गंभीर दुखापत होऊन विजय जागेवरच बेशुद्ध पडला.
"मी नवी मुंबई पोलीस दलात..." ओळखपत्र दाखवून ठोकली पसार!
भावाला वाचवण्यासाठी प्रकाश भानुसे याने हॉटेलमधील पाण्याचा जग उचलून मारहाण करणाऱ्यांच्या दिशेने फेकला. त्यावेळी मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने "माझे नाव राम सरगर असून मी नवी मुंबई पोलीस दलात नोकरीला आहे," असे सांगून स्वतःचे ओळखपत्र (ID Card) दाखवले, तर दुसऱ्याने आपले नाव लखन सरगर असल्याचे सांगितले. विजय रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्याचे दिसताच आरोपी राम सरगर, लखन सरगर आणि त्यांचा तिसरा अनोळखी साथीदार तेथून पसार झाले.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
घटनेनंतर तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. विशाल पाटील आणि प्रकाश भानुसे यांनी विजयला शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल, सांगली) येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून विजय पाटील यास दाखलपूर्व मृत घोषित केले.
सांगली पोलिसांत तक्रार दाखल; परिसरात संतापाची लाट भावाच्या हत्येनंतर विशाल वसंत पाटील याने सांगली पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. दिलेल्या वर्दीजबाबावरून १) राम सरगर, २) लखन सरगर आणि ३) एक अनोळखी इसम यांच्याविरुद्ध खुनाचा (IPC 302 / BNS) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ऐन पाडव्याच्या दिवशी कौटुंबिक आनंदात विरजण पडल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी खरोखरच पोलीस दलातील आहे का? हॉटेल मालकाची यात काय भूमिका होती? या सर्व बाजूंचा पोलीस आता कसून तपास करत आहेत. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी सांगलीवाडी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.