सांगली / तासगाव :- कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या नावाखाली ६५ पेक्षा जास्त शेतकरी आणि गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक करून गेल्या ७ वर्षे ८ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या फरारी आरोपीला सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने (EOW) अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे. प्रतीक दीपक कांबळे (वय ३४, रा. शिरगाव रोड, नागठाणे, ता. पलूस, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
आरोपी प्रतीक कांबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी संगनमत करून 'स्वराज्य ॲग्रो कंपनी' स्थापन केली होती. कडकनाथ कोंबडी पालनातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी चिखलगोठण (ता. तासगाव) येथील शेतकरी शिवाजी भानुदास चव्हाण यांच्याकडून १ लाख रुपये व इतर ६५ गुंतवणूकदार शेतकऱ्यांकडून पैसे गुंतवून घेतले.
कंपनीने शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडीचे युनिट देताना करारातील अटींचे पालन केले नाही आणि गुंतवलेली रक्कम परत न करता एकूण ५६ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करून विश्वासघात केला. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५७६/२०१९ अन्वये भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ सह MPID कायदा कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशी झाली थरारक कारवाई
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक स्वाती गायकवाड यांनी फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात केले होते.
तपासादरम्यान, सपोफौ रमेश कोळी व पोहेकॉ संदीप मोरे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी प्रतीक कांबळे हा सांगोला, मेटफळे परिसरात असून तो तेथून नागठाणे येथील आपल्या घरी जाणार आहे. माहिती मिळताच पथकाने तातडीने सांगोला, मेटफळे, आटपाडी, विटा, कुंडल आणि वाळवा मार्गे नागठाणे येथे धाव घेतली. राहत्या घरी सापळा रचून पोलिसांनी प्रतीक कांबळे याला जागीच ताब्यात घेतले. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ०२.२० वाजता त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली.
दोन दिवसांची पोलीस कोठडी
गुन्हा घडल्यापासून (२०१९ पासून) म्हणजेच तब्बल ७ वर्षे ८ महिने आरोपी फरार होता. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर करत आहेत.
मार्गदर्शन: तुषार दोशी (पोलीस अधीक्षक), कल्पना बारवकर (अपर पोलीस अधीक्षक).
नेतृत्व: स्वाती गायकवाड (पोलीस उपअधीक्षक, EOW सांगली).
अंमलदार: सपोफौ रमेश कोळी, पोहेकॉ संदीप मोरे, विशाल भिसे, रिचर्ड स्वामी, पोना सचिन मोरे (सर्व EOW सांगली) तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या सपोनि रूपाली बोबडे आणि पोकॉ कॅप्टन गुंडवडे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.