आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वाढता वापर आता जगभरात चर्चेचा विषय ठरत असतानाच, त्याविरोधात अमेरिका आणि युरोपमधील अनेक शहरांमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. एआयमुळे नोकऱ्यांवर येणारे संकट, डेटा सेंटरसाठी होणारा प्रचंड वीज आणि पाण्याचा वापर तसेच पर्यावरणावर होणारे परिणाम यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
काही ठिकाणी आंदोलकांनी मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त समोर आले आहे. आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे डेटा सेंटरच्या वाढत्या विस्ताराविरोधात सुमारे दोन हजार नागरिकांनी मोर्चा काढला.
तर फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे जवळपास 1 हजार 300 लोक या आंदोलनात सहभागी झाले. फिनलंडमधील अन्य काही शहरांमध्येही निदर्शने करण्यात आली.
डब्लिनमध्ये आंदोलकांनी पर्नेल स्क्वेअर येथून आयरिश संसदेपर्यंत मोर्चा काढला. नव्या डेटा सेंटरच्या उभारणीला परवानगी देण्यापूर्वी त्यांचा पर्यावरणावर आणि स्थानिक नागरिकांवर होणारा परिणाम तपासावा, अशी त्यांची मागणी होती.
ही आंदोलने ‘स्टॉप डर्टी डेटा सेंटर्स’ या मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पर्यावरणवादी संघटना, स्थानिक नागरिकांचे गट आणि डिजिटल अधिकारांसाठी काम करणाऱ्या संघटनांचा सहभाग होता.
6 नोव्हेंबर रोजी नेदरलँड्सची राजधानी अॅमस्टरडॅम येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले. मायक्रोसॉफ्टच्या नव्या डेटा सेंटरच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी शंभरहून अधिक आंदोलकांनी प्रवेश केला. काही आंदोलक क्रेनवर चढले, तर काहींनी फ्लेअर पेटवून निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांशीही त्यांची झटापट झाली. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे 150 ते 200 जणांना ताब्यात घेण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.