'काळा पैसा आणि निवडणूक निधी साठवणूक रोखा!'; ५००-२००० च्या नोटा बंद करण्यासाठी केंद्र सरकारमधील मोठ्या पक्षाचा एल्गार!
देशात ५००आणि २००० रूपयांच्या मोठ्या नोटा चलनातून बंद केल्या पाहिजेत अशी मागणी केंद्रातील सत्ताधारी घटक पक्ष टीडीपीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मागणी केली आहे.
मोठ्या चलनातील नोटा बंद केल्याने भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत होईल. त्याशिवाय यामुळे संपत्ती निर्मिती आणि गरिबी निर्मूलनाच्या दिशेने काम करणे देखील सोपे होईल. डिजिटल करेन्सी आणि तांत्रिक आधारे शासन व्यवस्थेचा पुढाकार घेत नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर ही मागणी केली आहे.
चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं की, डिजिटल चलनावरील रिपोर्टमध्ये मीच या सूचना केल्या होत्या. मी यापूर्वी पंतप्रधानांना याचा विचार करण्याचे आवाहन केले होते आणि आता पुन्हा तीच मागणी करत आहे. मी हा मुद्दा सातत्याने मांडत राहीन. ५००, १००० आणि २००० रुपयांच्या नोटा बंद केल्या पाहिजेत. फक्त १०० आणि २०० रुपयांच्या नोटाच बाजारात राहिल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलं.
नायडू यांचे हे विधान नोटाबंदीच्या १० व्या वर्षपूर्तीच्या दुसऱ्या दिवशी आले आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यावेळी काळा पैसा, बनावट चलन आणि भ्रष्टाचार रोखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले गेले होते.
तंत्रज्ञानाने संपवू शकतो भ्रष्टाचार - नायडू
नायडू मोठ्या मूल्याच्या नोटा रद्द करण्याच्या आपल्या प्रस्तावावर जोर देत राहतील. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास आर्थिक आणि प्रशासकीय प्रणालीतील अनेक गंभीर समस्या सोडवता येतात. तंत्रज्ञानाची योग्य अंमलबजावणी केल्यास संपत्ती निर्माण करणे आणि गरिबी दूर करणे कठीण नाही असं तेलुगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले. सध्या विविध स्तरावर भ्रष्टाचार दृष्टचक्र बनला आहे. हे चक्र तोडण्यासाठी अनेक पाऊले उचलण्याचा प्रयत्न केला पाहिजे असंही ते म्हणाले.
"निवडणुकीत पैसे वाटप बंद झाले पाहिजे"
दरम्यान, राजकारण पैशाने नव्हे तर लोकसेवेच्या भावनेने चालले पाहिजे. एनडीएने निवडणुकीत पैसे वाटण्याच्या प्रथेला आळा घालून एक नवीन राजकीय संस्कृती सुरू केली आहे. एनडीएने राजकारणात एक नवीन परंपरा सुरू केली आहे. राजकारण पैशाने नव्हे, तर सेवेच्या भावनेने चालले पाहिजे. निवडणुकीत मतदारांना पैसे वाटणे चुकीचे आहे. राजकीय नेत्यांची मानसिकता बदलण्यासाठी त्यामुळे मदत मिळेल. मागील २४ वर्षापासून मी निवडणूक व्यवस्थेत सुधारणा करण्याचे प्रयत्न करत आहे. राजकारणात पैशांचा प्रभाव कमी होईल यासाठी अनेक पर्याय शोधतोय असंही चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.