मिरजेत 5 किलो गांजा जप्त एकाला अटक, 1.30 लाखांचा 5 किलो गांजा जप्त : महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
भारत सरकारच्या " नशामुक्त भारत अभियान" च्या पार्श्वभूमीवर तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार मिरजेत गांजा विक्री करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली तर एकजण पसार झाला. दोघांविरोधात गुन्हा दाखल करून 1.30 लाख रुपयांचा 5 किलो तयार गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
संदीप सर्जेराव पाटील (वय २८, रा. मिरज-मालगांव रोड, सुभाषनगर, ता. मिरज) याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह पसार झालेला सिध्दाप्पा ऊर्फ सिध्दान्ना माळी (रा. ख्वॉजा बस्ती, मिरज) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत सरकारच्या " नशामुक्त भारत अभियान"च्या पार्श्वभूमीवर तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार महात्मा गांधी चौकचे सहायक निरीक्षक शिंदे यांनी अंमली पदार्थ विक्री, तस्करी, साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यावेळी पथकाला सोलापूर हायवेवरील अंकलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका उड्डाण पुलाजवळ दोघेजण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
पथकाने तेथे सापळा लावला. तेथे गांजा विक्रीसाठी आलेल्या संदीप पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 1.30 लाख रुपयांचा 5 किलो गांजा सापडला. तो जप्त करून त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने माळी याच्याकडून गांजा घेतल्याची कबुली दिली. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव, उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, सूरज पाटील, साक्षी पतंगे, नाना चंदनशिवे, जावेद शेख, मोसीन टिनमेकर, बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, राजेंद्र हारगे, चालक श्रेणी उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील, चालक सहायक उपनिरीक्षक सुनिल कांबळे, सायबर पोलीस ठाणेकडील सहायक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, उपनिरीक्षक अफरोज पठाण, कैप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.